Tuesday, May 19, 2015

त्या संस्था चालकांची अरेरावी थांबणार का ?

इंग्रजी माध्यमाचे संस्था चालक म्हणतात 'हम करे सो कायदा'
केवळ पुणे- मुंबई सारख्या बड्या शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढते आहे. आर्थिक परिस्थती असणारीच काय नसणारी कुटुंबेही या इंगजी माध्यमांच्या शाळांच्या मोहात अडकून हजारो रुपयांची अवास्तव फी भरून कर्जबाजारी होऊन मुलांना महागड्या इंग्रजी शाळांमध्ये घालत असल्याचे चित्र उत्तर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण परिसरात बघायला मिळत आहे. त्याचाच फायदा घेत काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी गोरगरीब विद्यार्थी आणि पालकांवर मोठी अरेरावी चालविल्याचा प्रकार काही मोजक्या शाळांमध्ये सर्रास घडत आहे.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडण्यात आल्याचे चित्र या भागात सर्वदूर दिसत आहे. शहरी भागातील इंग्रजी भाषेचा अनुनय आता ग्रामीण भागात रुजला असून  याचा मराठी शिक्षणावर परिणाम मोठ्या प्रमाणात दिसत असल्याचे बोलले जात आहे.  काही वर्षांपूर्वी या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये श्रीमंतांच्या मुलांची असलेली मक्तेदारी आता संपुष्टात आली असून सामान्य कुटुंबातील पालकही इंग्रजी माध्यमाचा अट्टहास कितीही मोठी आर्थिक झळ सोसून करीत आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकणारी मुले हुशार होतात असा समज मोठ्या प्रमाणात पसरला आहे .
मात्र ग्रामीण भागात अशा इंग्रजी माध्यमाच्या बेकायदा शाळा, अप्रशिक्षित शिक्षक आणि एकंदरच दर्जाचा अभाव या समस्यांकडे मात्र लक्ष दिले जात नाही. आश्चर्याची बाब म्हणजे उत्तर पुणे जिल्ह्यातील काही इंग्रजी शाळांच्या मान्यता बनावट असल्याची बाब अनेकदा समोर आल्यानंतरही पालकांकडून याबाबींकडे दुर्लक्ष होत आहे. शिवाय या भागातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी ‘साम - दाम - दंड - भेद' अशा सर्व प्रकारांचा आधार घेत 'हम करे सो कायदा' अशी अरेरावीची भूमिका घेत पालकांची पिळवणूक गेल्या काही वर्षांपासून सुरु केली आहे. 

नुकत्याच इंग्रजी शाळेत मराठीत बोलण्यावरून झालेल्या मारहाणी नंतर या भागातील एका अशाच शिक्षण संस्थेच्या मालकास अटक झाल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. या भागातील त्यांच्याच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत भरमसाठ फी, वेगवेगळे निधी, आणि जुलमी कायद्यांबाबत जाब विचारणा-या पालकांच्या मुलांना थेट घरचा रस्ता दाखविण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची ही जुलमी राजवट अव्याहत पणे सुरु आहे.
खुद्द संस्था चालक मोठ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे अनेक दाखले या भागात देण्यात येतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात काहीही बोलण्याचे धारिष्ट्य कुणीही दाखवत नाही. पोलीस, गुंड आणि शिक्षण क्षेत्रातील मात्तबर अधिकारी वेगवेगळे मोठे राजकारणी यांचे पाठबळ संबंधिताला असल्याने पालक वर्ग हतबल आहे. त्यामुळे बिनबोभाट पणे इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी गोरगरीब विद्यार्थी आणि पालकांवर चालविलेली मोठी अरेरावी कधी संपणार या प्रश्नाने अनेक हतबल पालकांना भंडावून सोडले आहे.
- See more at: http://mpcnews.in/index.php/component/k2/item/934-2014-07-14-04-00-20#sthash.cxVDJCM1.dpuf