मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) : मुलाला शिक्षण इंग्रजीतूनच द्यायचे या दुराभिमानाने पाल्याचा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला जातो. मात्र शिक्षणाच्या पहिल्या दुसर्या वर्षादरम्यान पाल्याच्या आणि पालकाच्या बौध्दीक कसरतीनंतर ज्ञान मिळवण्यास मातृभाषाच योग्य असल्याचा साक्षात्कार झाल्यावर माध्यम बदलण्याचे प्रयत्न पालकांकडून केले जातात. सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या शाळेत माध्यम बदलाचे तेरा प्रवेश देण्यात आल्याचे समोर आले. मात्र अशा माध्यम बदलणाऱया इच्छूक विद्यार्थी मार्गदर्शनाअभावी दुर्लक्षित राहत असल्याचेही या निमित्ताने समोर आले.
सध्या शाळांना उन्हाळी सुट्या सुरू असल्या तरीही शाळांमधील नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आगामी शैक्षणिक वर्षासाठी पहिली पासूनचे प्रवेश प्रक्रिया सूरू आहेत. मातृभाषेतून शिक्षणासाठी मराठी शाळांकडे पालकांचा ओढा असून देखील खोट्या दुराभिमानानाने इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेतला जातो. मात्र कालांतराने चूक लक्षात येत असते. जागतिक ज्ञानभाषा इंग्रजी असल्याचे सांगत इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेतला जातो आणि ज्ञान आकलनाची पहिली पायरी चुकते. मुंबई आणि उपनगरांमध्ये इंग्रजी माध्यमाचे फॅड वाढीस लागल्यापासून मराठी शाळा बंद होत चालल्या आहेत. मुंबई शहर जिह्यात 2004 साली 450 मराठी शाळा होत्या. आज मराठी शाळांची संख्या निव्वळ 87 वर येऊन ठेपली आहे. दादर, विलेपार्ले, मुलुंड असा मराठी वस्त्यांच्या परिसरात काही खासगी मराठी शाळा तग धरून आहेत. राज्य शिक्षण विभागाचे जिल्हा परिषदांच्या मराठी शाळांकडे अधिक लक्ष असल्याने मुंबई सारख्या शहरातील मराठी माध्यमांच्या शाळांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलमध्ये नव्या शैक्षणिक वर्षासाठी मराठी माध्यमात 300 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तर माध्यम बदलासाठी विचारणा होत असते, यावर्षी 13 विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मराठी माध्यमामध्ये प्रवेशासाठी विचारण्यात आले असल्याचे संस्थेच्या राजेंद्र प्रधान यांनी सांगितले. इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतल्यानंतर वर्षभरातच इंग्रजी जमत नाही, किंवा आमच्याही आकलनाबाहेर आहे अशा तक्रारी करत पालक माध्यम बदलाचे प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले.
मात्र माध्यम बदलासाठी इच्छुक पालकांची आणि विद्यार्थ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात असू शकते. याबाबत शिक्षण विभागाकडून गोंधळलेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा अधिकारही त्यांना मिळेल असे सांगण्यात आले.
मात्र माध्यम बदलासाठी इच्छुक पालकांची आणि विद्यार्थ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात असू शकते. याबाबत शिक्षण विभागाकडून गोंधळलेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा अधिकारही त्यांना मिळेल असे सांगण्यात आले.
http://goo.gl/eF34Qr